शेवगाव : कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरत आहे. त्या अनुषंगाने शहरासह ग्रामीण भागात आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १८ ते ४४ वयोगटातील ज्या व्यक्तींकडे स्मार्टफोन आहेत, अशा व्यक्ती शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर लसीकरणासाठी आगाऊ नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेत आहेत. मात्र, दुसरीकडे कष्टकरी, मजूर तसेच ग्रामीण भागातील बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन नसल्याने सदर मंडळी लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
तालुक्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे जास्तीतजास्त लसीकरण होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लसीकरणासाठी संकेतस्थळावर किंवा अॅपवर जाऊन आगाऊ नोंदणी झाल्यावर लसीकरणाचे ठिकाण व वेळ याची माहिती नोंदणीकृत मोबाइलवर मेसेजद्वारे दिली जात आहे. मात्र, सदरची प्रक्रिया ग्रामीण भागातील नागरिकांसाठी व कष्टकरी, मजूर लोकांसाठी गुंतागुंतीची,अडचणीची तसेच डोकेदुखी ठरली आहे. स्मार्टफोन, नेटवर्क, मोबाइलबद्दलचे अज्ञान, नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती नसणे, आदी गोष्टींमुळे सदर नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी कुठे, कशी करावी, हा प्रश्न भेडसावत आहे.
शहरी भागातील ९० टक्के नागरिक स्मार्टफोनचा वापर करत आहेत, तर तुरळक म्हणजेच ५ ते ७ टक्के लोकांकडे साधे मोबाइल आहेत. हेच चित्र ग्रामीण भागात अगदी उलटे आहे. ९० टक्के नागरिकांकडे स्मार्टफोन नाहीत. सदर मंडळींना स्मार्टफोनचा कसा वापर करावयाचा, याची कल्पना नाही. तसेच गावात नेटवर्कची अडचण, नोंदणी केल्याशिवाय लस मिळत नाही, आदी प्रश्न भेडसावत असताना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
---
बाहेरच्यांचीच गर्दी वाढतेय...
लसीकरणासाठी संकेतस्थळावर किंवा अॅपवर जाऊन आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे. परंतु, लसीकरणाचे ठिकाण बंधनकारक नसल्यामुळे तालुक्यातील असलेल्या केंद्रांवर जिल्ह्याबाहेरील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीत स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
---
निरीक्षणात तथ्य आहे. १८ ते ४४ वयोगटातील मजूर, कष्टकरीवर्ग लसीकरण करून घेण्यासाठी पुढे आलेला दिसून येत नाही. लसीकरण सत्रात स्मार्टफोनचा वापर करणारे नागरिक लस घेण्यासाठी आलेले पाहिला मिळतात. आगाऊ नोंदणी करून बुकिंग झालेली आहे, अशांना लस दिली जाते. बुकिंग झालेल्या लाभार्थ्यांमध्ये शेजारच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील नागरिकही असतात.
-डॉ. रामेश्वर काटे,
वैद्यकीय अधीक्षक, शेवगाव