श्रीरामपूर : मध्य रेल्वे प्रशासनाने अद्यावत व सर्व सोयीयुक्त सुरु केलेल्या नागपूर- पुणे हमसफर एक्स्प्रेसला नगर जिल्ह्यात थांबा न दिल्यामुळे श्रीरामपूर प्रवासी संघटनेनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात थांबे देवून प्रवासी जनतेला न्याय द्यावा, असा ठराव केला आहे.प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मध्य रेल्वेने नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेसला चाळीसगावला थांबा दिला. मात्र, कोपरगाव, श्रीरामपूर व नगर रेल्वे स्थानकावर थांबा न देता प्रवाशांची गैरसोय केली असल्याचे सचिव अनिल कुलकर्णी यांनी नमूद केले.यावेळी रेल्वे व एस. टी. प्रवाशांच्या विविध प्रश्नाबाबत प्रा. गोरख बारहाते, किशोर अग्रवाल, विठ्ठलराव कर्डिले, अनिता आहेर, किरण घोलप, गणेश वाघ, चंद्रकांत ताथेड, साहित्यीक नामदेव देसाई आदींनी चर्चेत भाग घेतला. आमदार व खासदार यांनी या प्रश्नाकडे लक्ष देवून रेल्वे प्रशासनाला जाग आणावी, अशी मागणी करण्यात आली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. शर्मा व विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांना वरील एक्सप्रेसला थांबा देण्याबाबत निवेदन तातडीने पाठविल्याची माहिती विठ्ठलराव कर्डिले यांनी दिली.