अहमदनगर : नाटक संघातील एका मुलीच्या वडिलांवर एका कोविड हस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू होते. दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने त्या मुलीच्या जीवाची घालमेल सुरू झाली. अन्य एका मुस्लीम रुग्णाच्या नातेवाईक व तरुण मुलांनी रात्रभर हिंडून ऑक्सिजन सिलिंडर आणले. त्या मुलीला मात्र सिलिंडर कुठेच मिळाला नाही. त्यात एका हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याने तुम्ही आणलेले सिलिंडर फक्त तुमच्याच नातेवाईकासाठी ठेवण्याचे सांगताच त्या मुलीच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र त्या मुस्लीम शिक्षकाने, मला अल्लाह माफ करणार नाही, ज्यांना गरज आहे, त्यांना ऑक्सिजन द्यायचे सांगितले. त्याच रात्री शेख नावाच्या त्या मुस्लीम शिक्षकाने शक्य होतील तेवढे ऑक्सिजन सिलिंडर मिळवले आणि रुग्णांना जीवदान दिले. या प्रसंगाने शेख यांच्या रुपात त्यांना विठ्ठल दिसला आणि माणुसकीचा झराही.
नगरमधील नाट्यकर्मी संदीप दंडवते यांनी एका भयाण रात्रीचा अनुभव फेसबुकवरून शेअर केला आहे. अहमदनगरमध्ये रोज तीन हजार रुग्ण बाधित होत असून २३ हजार रुग्ण सक्रिय आहेत. गंभीर रुग्णांसाठी रोज ६० टन ऑक्सिजन लागतो. मात्र २० एप्रिलच्या रात्री केवळ १५ टन ऑक्सिजन मिळाला होता. सर्वच हॉस्पिटलमध्ये दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. त्या रात्रीवर काळरात्रीचे सावट होते. रुग्णांचे नातेवाईक बिथरले होते. मिळेल तेथून ऑक्सिजन सिलिंडर आणून ते रुग्णांना देण्याची रात्रभर धावपळ सुरू होती. अशा स्थितीत त्या मुलीच्या वडिलांचे ऑक्सिजन न मिळाल्याने दोन-चार तास फक्त आयुष्य शिल्लक राहिले होते. अशावेळी तिची घालमेल या पोस्टद्वारे उलगडली आहे.
या पोस्टमध्ये दंडवते यांनी लिहिले आहे की, ‘हॉस्पिटलने ऑक्सिजन संपणार असल्याने रुग्णांना दुसरीकडे हलवायला सांगितले जात होते. बाहेरच्या रुग्णालयात कुठेच बेड शिल्लक नव्हते. आता तिच्या वडिलांचे काय होणार या विचाराने मला तर घामच फुटला होता. एकीकडे तिच्या बहिणींची बेडसाठी धावाधाव सुरू होती. रुग्णालयात सात ते आठ रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्यात तीन रुग्णांचे ऑक्सिजन काढले की ते केवळ दोनच तास जगणार होते. त्यात आमच्या रुग्णाचाही समावेश होता. आमच्या रुग्णासाठी तिघे, तर दुसऱ्या एका मुस्लीम महिला रुग्णासाठी सात मुस्लीम युवक व एक पन्नास वर्षे वयाचे मुस्लीम शिक्षक मदतीला होते. रुग्णाला इतर ठिकाणी हलवणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्याशिवाय पर्याय नव्हता. अशावेळी त्या सात मुस्लीम तरुणांनी रात्रभर फिरून पाच सिलिंडर आणले आणि रुग्णांना दिले. आमचा-तुमचा असा भेद न करता त्यांनी आणलेले सिलिंडर आवश्यक असलेल्या तिन्ही गंभीर रुग्णांना लावले आणि त्यांचे प्राण वाचवले.’ अशीच परिस्थिती २० एप्रिलच्या रात्री नगरमधील अनेक रुग्णालयांमध्ये होती.
---
कोणताही भेदभाव न करता मरणाच्या दारात असलेल्या सर्वच रुग्णांना सिलिंडर देण्यासाठी शेख यांनी धावपळ केली. त्याचवेळी मला त्यांच्या रुपात माझा विठ्ठल दिसला. नवस-सायास, उपास-तापास, जपजाप्य, व्रत वैकल्य न करता देवदर्शन झाले होते. कधीही दगडाच्या मूर्तीसमोर न जोडले गेलेले माझे हात इथे आपोआप जोडले गेले होते. कुणाला काही होणार नाही. सगळे मिळून प्रयत्न करूयात, या शेख यांनी दिलेल्या धीराने आमच्याही जीवात जीव आला. सर्वांनी मिळून त्या रात्री १२ ऑक्सिजन सिलिंडर मिळविले आणि सर्वच रुग्णांचे प्राण वाचवले.
-संदीप दंडवते, नाट्यकर्मी
---
नगरमध्ये एकाने गाडी विकून आणले सिलिंडर
नगर शहरातील शहनवाज नावाच्या व्यक्तीने स्वतःची गाडी विकून लोकांना चार हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरवले आहेत. कोणी तरी अहमद आणि त्याचा भाऊ एक वर्षापासून कोरोनाने मृत्यू पावलेले मृतदेह स्मशानात जाळत आहेत. जिथे सख्खे नाक मुरडतात तिथे हे दोघे अख्खेच्या अख्खे उभे असतात. त्या सर्वांच्या प्रयत्नामळे सर्व रुग्ण वाचले.