श्रीगोंदा (जि.अहमदनगर): विवाह निश्चिती झाली, निमंत्रण पत्रिका छापल्या, विवाहाची घटीका समीप आली असताना नवरदेवाने हुंडा म्हणून गाडीची मागणी केली आणि विवाह मोडला. त्यामुळे संतप्त झालेल्या वधूने पोलिसांकडे फिर्याद दिली़ नवरदेव व त्यांच्या कुटुंबीयांना बेड्या ठोकाव्यात यासाठी वधू व महिला नातेवाईकांनी बेलवंडी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. याबाबत माहिती अशी की, घारगाव येथील संजय शिंदे यांच्या थोरल्या कन्येचा विवाह बेलवंडी येथील अर्जुन गेनबा हिरडे याचे पुत्र एकनाथ याच्याबरोबर निश्चित करण्यात आला. वधू-वर दोघे पदवीधर, हुंडा, मान ठरला. २५ मे रोजी विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. मुलीचे वडील संजय शिंदे यांनी कर्ज काढून विवाहाची तयारी केली. मात्र नवरदेवाने ऐनवेळी हुंडा म्हणून बोलेरो गाडीची मागणी करुन विवाह मोडला. त्यामुळे संतप्त वधूने २० मे रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी एकनाथ अर्जुन हिरवे (नवरदेव), अर्जुन गेनबा हिरवे (नवरदेवाचे वडील), गोधाबाई अर्जुन हिरवे (नवरदेवाची आई), भाऊसाहेब गेनबा हिरवे, यमुनाबाई भाऊसाहेब हिरवे, आप्पासाहेब हिरवे, सविता हिरवे, भास्कर हिरवे, मनिषा भास्कर हिरवे (रा.बेलवंडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. नवरदेव व इतर आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात म्हणून गुरुवारी (दि़२२) वधू व इतर १० ते १२ महिलांनी बेलवंडी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. दोन दिवसात सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक नारायण वाखारे यांनी दिल्यानंतर महिलांनी उपोषण मागे घेतले. मात्र आरोपींना दोन दिवसात अटक न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी) पोलिसांची बेडी २५ मे रोजी एकनाथ हिरवे हा लग्नाच्या बेडीत अडकणार होता़ परंतु हुंड्यासाठी लग्न मोडल्याने आता एकनाथच्या हातात पोलिसांची बेडी पडणार आहे.
गाडीसाठी ‘त्याने’ मोडले लग्न
By admin | Published: May 23, 2014 1:15 AM