केडगाव : नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाकोडीत मुंबई रिटर्न असलेल्या एका ४१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती गाडे -मांडगे यांनी दिली. मुंबईहून पत्नीला भेटायला तो आला होता. नगर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधितांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे. त्यातच हळूहळू ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर तालुक्यातील आलमगीर वगळता इतर गावे कोरोनामुक्त होती. परंतु, सोमवारी वाकोडीत एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तो व्यक्ती १८ तारखेला मुंबईहून आला होता. त्याच्याबरोबर त्यांची दोन मुलेही आली आहेत. मुले त्याने नातेवाईकांकडे सोडली आहेत. त्या व्यक्तीला त्रास होवू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य अधिकारी मांडगे यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना बाधीत मुंबईचा पोलीस सदर रुण मुंबई येथे पोलीस कर्मचारी आहे. त्यांनी आठ दिवसापूर्वी मुलांना नातेवाईकांच्या घरी पाठवले. तर पत्नीला वाकोडी येथे पाठविले. या तरुणाबरोबर चार मित्र पळून आले आहेत. त्यातील एक वाकोडी, सुपा, कोयाळ पिंपळा येथील आहेत. नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेड झोन येणा-या नागरिकाचे प्रमाण वाढत आहे. गावात आल्यानंतर ते क्वारंटाईन होत नाही. नातेवाईक ही त्यांना आश्रय देत आहेत. ग्रामसुरक्षा समितीला हे लोक दाद देत नाहीत. नगर, सुपा एमआयडीसीमधील नागरिकांचा मुंबईमध्ये संपर्क जास्त आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत आहे.
पत्नीला भेटायला आला अन् निघाला कोरोनाबाधीत; मुंबई रिटर्नने वाढविली वाकोडीकरांची धडकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:16 PM