अहमदनगर : नेहमीप्रमाणे मुलांना आजोबांच्या कुशीत सोडून तो रोजीरोटी कमवण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, अकालीच काळाने त्याच्यावर झडप घातली. घरातील हा शेवटचा मुलगा़ तोही देवाने हिरावला. त्यामुळे ७३ वर्षीय वृद्धाची नातवंडांच्या चिंतेने काहिली होतेय. आता नातवंडांना कसं सांभाळू, त्यांचं शिक्षण कसं करु, असं विचारण्यापलिकडं काहीच उरलं नसलेली ही करुण कहाणी आहे.गरडवाडीचे वामन यदू सांगळे यांची!गरडवाडी हे शेवगाव तालुक्यातील छोटसं गाव़ गावाच्या पश्चिमेला वामन सांगळे यांचे छोटेस घर आहे. सुगंधा या त्यांच्या पत्नी़ त्या ६८ वर्षांच्या आहेत. दोघेही थकलेले, शिणलेले़ त्यांना कुंडलिक, राम, लक्ष्मण आणि सुनीता अशी चार अपत्य़ कुंडलिक आणि राम हे आधीच अपघाती मरण पावलेले. तर मुलगी सुनीता यांनाही तरुणपणीच वैधव्य आले. या वृद्ध जोडप्याची म्हातारपणाची एकमेव काठी, कमावता मुलगा लक्ष्मण हा ११ दिवसांपूर्वी काम करत असताना विजेचा धक्का बसून मरण पावला. जन्मदात्या तीनही मुलांना गमावण्याचं दु:ख या म्हाता-या आई-बापांच्या वाट्याला आले आहे.सांगळे यांना दोन एकर जमीऩ तिही कोरडवाहू. मुळा कालव्यातून सुटणारे पाणीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पाहुणे, राजकीय नेते येतात़ सांत्वन करुन जातात़ रडून-रडून सांगळे कुटुंबाचे घसे कोरडे पडलेत. चेहरे काळवंडलेत. आम्ही आता या मुलांना कसं जगवू, असा एकच प्रश्न ते प्रत्येकाला विचारत आहेत.लक्ष्मण यांचा मुलगा प्रथमेश सहावीत शिकतोय तर मुलगी ज्ञानेश्वरी तिसरीत आहे. पत्नी आशा शेतकाम व मजुरी करतात. लक्ष्मण पत्नी आशा आणि मुलांना घेऊन ऊसतोडणीसाठी जायचे. पण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी महावितरणचे पोल टाकून तारा ओढण्याचे काम स्वीकारले होते. हे काम ते ठेकेदारीवर करीत होते. ६ फेबु्रवारीला लक्ष्मण सकाळी कामावर गेले. मात्र, परत घरी आलेच नाहीत. मात्र त्यांच्या मृत्युची वार्ता सांगणारा घरी आला. ते ऐकून वामन जमिनीवरच कोसळले. आता या मुलांचं शिक्षण, संगोपन कसं करायचं, हा त्यांच्या पुढला सर्वात मोठा प्रश्न आहे.
मुलांना आजोबाच्या कुशीत सोडून त्याने घेतला जगाचा निरोप; नातवंडांच्या चिंतेने वृद्धाची काहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:45 PM