अहमदनगर : जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांच्या विकासकामांमध्ये गतिमानता व गुणवत्ता असावी यासाठी सर्व विभागाच्या महत्त्वाच्या योजनांचे कामकाज व प्रशासकीय कामकाजाच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, या दृष्टीने तालुकास्तरीय संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. मागील आठवड्यात जवळपास सर्वच विभाग प्रमुखांनी त्यांना नेमणूक दिलेल्या तालुक्यांना भेटी दिल्या आहेत. त्या ठिकाणी प्राधान्याने घरकुलांची कामे पूर्ण करून घेणे, कोविड केअर सेंटर, कोविड लसीकरणाची ठिकाणे या ठिकाणी जाऊन अधिकारी आढावा घेत आहेत. यासह तालुक्याच्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाकडील न्यायालयाची प्रकरणे, लोकायुक्तांची प्रकरणे आणि आस्थापनाविषयक बाबी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील भूमिहीनांच्या जागेचा विषय, घरकुलांचा आढावा, डेमो घरकुल हाऊसची उभारणी, पाणीपुरवठा विभागाकडील १०० दिवसांत ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाड्यांना पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, घनकचरा व्यवस्थापन, शौचालयाचा आढावा, रोजगार हमीची पूर्ण, अपूर्ण कामांचा आढावा, लेबर बजेटची स्थिती, शिक्षण विभागाकडील ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था, शालेय पोषण आहार, शिक्षकांच्या गृहभेटी, स्वाध्याय पुस्तिका, समाजकल्याणकडील मागासवर्गीयांच्या विविध योजना, अपंग समावेशक योजना, महिला बालकल्याणच्या विविध योजना यांचा आढावा घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.