केडगाव : नगर तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावपुढाऱ्यांच्या दबावतंत्राला वैतागले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन याबाबतची व्यथा मांडण्यात आली.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता कोरोना रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त आहेत.
कोविड सेंटरला सेवा देणे, कोरोना तपासणी, लसीकरण, तसेच शासकीय पातळीवर विविध अहवाल तयार करणे, याचबरोबर कोरोना रुग्णांची तपशीलवार आकडेवारी तयार करणे या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. त्यातच अपुरे मनुष्यबळ असताना कर्मचारी जास्त वेळ काम करून सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशातच आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना गावपुढाऱ्यांकडून अरेरावी, दमबाजी करण्याचे प्रकार वाढत आहेत. ज्याला अधिकार नाही, अशा व्यक्ती आरोग्य केंद्रात येऊन डीफ्रिजरमध्ये हात घालून लस आहे किंवा नाही याची बळजबरीने पाहणी करीत आहेत, तसेच कोणीही कामकाजाच्या अहवालाची मागणी करीत आहे. एखादा रुग्ण दगावल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी आरोग्य विभागावर जबाबदारी टाकण्यात येते. गाव पुढाऱ्यांकडून वेळी-अवेळी फोन करून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. हाच प्रकार महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत घडत असून, यातून मनोबल खच्ची होत आहे. तरी याबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना दिलेल्या निवेदनात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, डाॅ. अनिल ससाणे, डॉ. भारत कोठुळे, डॉ. निवेदिता माने, डॉ. रश्मी शिंदे, डॉ. शुंभागी पवार, डॉ. प्रियका पवार, डॉ. प्रियंका शेंदूरकर, डॉ. कल्पना पोहरे, डॉ. सुप्रिया थोरबले आदींची उपस्थिती होती.
---
नगर तालुक्यातील आरोग्य विभागाचे काम उत्तमरीत्या सुरू असून, अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना गाव पुढाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती समजली. यापुढे सर्व नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे.
-डॉ. ज्योती मांडगे,
तालुका आरोग्य अधिकारी, नगर
--
गावातील पुढारी आधी माझ्याच गावात लसीकरण करा यासाठी आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. लसींचा तुटवडा जाणवत आहे. लस आल्यानंतर सर्व गावांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.
-डॉ. योगेश कर्डिले,
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर