अहमदनगर : सोमवारी सायंकाळी अचानक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता औरंगाबादचे आरोग्य उपसंचालक सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली़ सिव्हील हॉस्पिटलमधील अस्वच्छता पाहून आरोग्य उपसंचालक चांगलेच संतापले. सिव्हील हॉस्पिटलची पाहणी करुन त्यांनी अधिका-यांची झाडाझडती घेतली.
मंगळवारी सकाळी ८ वाजताच आरोग्य उपसंचालक विजय कंधेवाढ व आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल होताच कंधेवाढ यांनी अधिका-यांची बैठक घेतली. आरोग्य मंत्र्यांकडे रुग्णांनी केलेल्या तक्रारींबाबत तसेच सिव्हील हॉस्पिटलमधील सुविधांबाबत आरोग्य उपसंचालक कंधेवाढ यांनी आढावा घेतला. त्यानंतर कंधेवाढ यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. अंतर्गत स्वच्छता तसेच परिसर स्वच्छतेची पाहणी केली. ठिकठिकाणी असलेले कच-याचे ढीग आणि अंतर्गत अस्वच्छता पाहून कंधेवाढ चांगलेच संतापले. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे यांना स्वच्छतेविषयी सूचना दिल्या.
या अचानक भेटीबाबत डॉ. कंधेवाड यांना विचारले असता ते म्हणाले, ही नेहमीची तपासणी आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग बरुटे म्हणाले, भारत स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ही तपासणी आहे.दरम्यान सोमवारी सायंकाळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा माहिती कार्यालय, सिव्हील हॉस्पिटल, पोलीस प्रशासन अशा कोणत्याच विभागाला खबर लागू न देता सिव्हील हॉस्पिटलला भेट दिली़ त्यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये फिरुन रुग्णांशी संवाद साधला. काही रुग्णांनी त्यांच्याकडे असुविधांबाबत तक्रारीही केल्या होत्या. त्यावेळी तेथे काही नर्स व डॉक्टर उपस्थित होते. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ पांडुरंग बरुटे हे त्यावेळी रुग्णालयात उपस्थित नव्हते. मंत्री सावंत यांनी जिल्हा रुग्णालयात राऊंड मारुन जिल्हा रुग्णालयाची माहिती घेतली. तेथील काही रुग्णांशी संवाद साधला. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात, अपेक्षित सोयीसुविधाही मिळत नाहीत, वारंवार तक्रारी करुनही त्यांची दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी काही रुग्णांनी केल्या. थोडा वेळ थांबून आरोग्य मंत्र्यांनी तेथून निरोप घेतला. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्याचे सांगितले जात आहे.