संगमनेर : बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेरन्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीची सुनावणी शुक्रवारी होणार होती. ती न्यायालयाने पुढे ढकलली असून ती आता २० ऑगस्टला होणार आहे, अशी माहिती इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली.
गर्भलिंग कायद्याविरोधी वक्तव्य समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी केले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी शुक्रवारी (१९ जून) संगमनेर न्यायालयात फिर्याद दिली होती. शुक्रवारी (३ जुलै) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले होते. सरकारी वकील अॅड. लीना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली होती.
इंदोरीकर महाराज यांनी फेब्रुवारी महिन्यात पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर २६ जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले होते?
'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'