केडगाव : नगर तालुक्यात रोहिणी नक्षत्राने जोरदार सलामी दिली. तालुक्यात जवळपास सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने सलामी दिली. वाळकी, चिंचोडी पाटील, रूईछत्तीसी मंडलात समाधानकारक पावसाची नोंद झाली.
मागील वर्षी तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली होती. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तालुक्यात शनिवारी रात्री जोराच्या वाऱ्यासह रोहिणी बरसल्या. पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात सध्या खरिपाची लगबग सुरू आहे. तालुक्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन असून यंदा प्रथमच मूग व सोयाबीनच्या लागवडीत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील जेऊर परिसराचा अपवाद सोडला तर कमी-अधिक प्रमाणात पावसाने सलामी दिली. रोहिणी नक्षत्रात जोरदार सरी बरसल्या, तर मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडतो. त्यामुळे खरिपाच्या पेरणींना वेग येतो. शनिवारच्या पावसात गावोगावच्या नद्या-नाल्यांमधून पाणी वाहिले असले तरी लगेच त्या पाण्याचा निचरा झाला. शेतातही काही प्रमाणात पाणी साचले होते. जनावरांसाठी असलेल्या कडवळ, मका या पिकांची जोरदार वाऱ्याने दाणादाण उडवली. तालुक्यात २७.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
----
मंडलनिहाय पावसाची नोंद (मि.मी)..
नालेगाव- १२.८, सावेडी-१७, कापूरवाडी-१८.८, केडगाव-३०.३, भिंगार-२१.८, नागापूर-१०, जेऊर-०, चिंचोडी पाटील-५०.८, वाळकी-६६.८, चास-३६.८, रूईछत्तीसी-४२.५.
---
फोटो आहे