अहमदनगर/श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील घारगावसह परिसरात सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास जोरदार वारा, विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. याशिवाय गारपिटीने कांदा, आंबा, लिंबू, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. पारनेर शहरासह तालुक्यात वादळासह पाऊस झाला. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातही रात्री सातच्या सुमारास पाऊस झाला.
मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभर ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत आहे. मात्र जोराचा वारा सुटल्यानंतर वातावरणात बदल होऊन ढग गायब होत आहे. शनिवारी सायंकाळी पारनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव, नगर शहर अशा परिसरातील काही भागात पाऊसही झाला होता. सोमवारी पुन्हा वातावरण बदलले. सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता व अगदी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी बारानंतर पुन्हा उन्हाचा चटका जाणवला. सायंकाळी चारनंतर पुन्हा ढग जमा झाले. पारनेर शहरासह परिसरात दुपारी दोनच्या सुमारास अर्धा तास पाऊस झाला. येथेही कांदा पिकाचे नुकसान झाले. याशिवाय संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातही अवकाळीने तडाखा दिला. पावसापेक्षा वारा अधिक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
--
१२ घारगाव गारपीट
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात झालेली गारपीट
मागील महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस झाला होता. त्या तडाख्यातून श्रीगोंदा तालुका वाचला होता. सोमवारी श्रीगोंदा तालुक्यालाही गारपीट, वादळाने तडाखा दिला. यात सर्वाधिक कांदा पिकाचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या गळाल्या. लिंबोणीच्या झाडांचे कच्चे लिंबू पडून नुकसान झाले. काही ठिकाणी ऊसही झोपला. द्राक्षे, डाळिंब बागांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.