लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेवगाव तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने लोकांची चांगलीच धावपळ उडाली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेलेल्या नागरिकही पावसात अडकून पडले.
यंदा नगर जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातही परतीचा मान्सूनचा मुककाम चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली असून विसर्ग सुरु आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. सायंकाळी सहा वाजल्यानंतर ढग अधिक गडद झाले. श्रीगोदा तालुक्यातील कोळगाव, घारगाव व विसापूर परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. तसेच नगर तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट व वा-याच्या वेग असल्याने उसाचीही पडझड झाली आहे. नगर शहरात सात वाजता अचानक पावसास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. कर्जत, जामखेड, राहुरी, अकोले, संगमनेर , राहाता तालुक्यातील विविध भागाला पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. नगर जिल्ह्यात आतापर्यत तब्बल ७७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जामखेड व अकोले तालुक्यात सरासरी एक हजार मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यापासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून पावसाचा जोर कायम असल्याने रब्बीच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासकिय यंत्रणेने पाहणी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. गतवर्र्षीपेक्षा ज्वारीचे क्षेत्र घटणार असून हरभरा व गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.