अहमदनगर : गेल्या बारा तासांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात जोरदार पाऊस सुरू झाले. त्यामुळे नद्या, तलाव, धरणांमध्ये नव्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळा, भंडारदरा, सीना, घोड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक विसर्ग दौंड पुलावरून ११ हजार क्युसकने सुरू झाला आहे.
बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झाली आहे. गुरुवारी सकाळी भंडारदरा धरणातून ८१२ क्युसेक, निळवंडे धरणातून १६४० क्युसेक, गोदावरी नदीतून नांदुरमधमेश्वर बंधाºयातून ४०४, दौंड पुलावरून (भीमा नदी) ११ हजार ८०, घोड धरणातून ४२००, मुळा धरणातून ९००, सीना धरणातून ११४२ क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सीना नदीलाही पूर आला आहे. भीमा नदीला पूर आल्याने दौंड पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर आहे. कधी उन तर कधी पाऊस असे वातावरण सध्या सुरू आहे. नगर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या या पावसाने शेतकरी वर्गाची, विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे.