कोतूळ : गेल्या दोन दिवसांपासून हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोतूळ-राजूर रस्त्यावरील पुलाजवळ शुक्रवारी (दि.५ जून) रात्री पाणी आले. वटपौर्णिमेला मुळा नदी अनेक वर्षानंतर वाहती झाली आहे.
हरिश्चंद्रगड, लव्हाळी,पाचनई, कोहणे, कोथळे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. यावर्षी अंबित, बलठण, शिळवंडी या लघु पाटबंधारे तलावात भरपूर पाणी होते. हरिश्चंद्रगड ते पिंपळगाव खांडपर्यंत सर्व कोल्हापुरी बंधारे भरले आहेत. त्यातील काही पाणी सोडण्यात आले होते. परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे मुळा वाहती झाली आहे. गेल्या २० वर्षानंतर प्रथमच रोहिणी नक्षत्रात मुळा नदी वाहती झाल्याचे येथील जुने लोक सांगतात.
मुळा नदीच्या उगमापासून कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे व लघु पाटबंधारे तलावात यावर्षी भरपूर पाणी जूनअखेर शिल्लक होते. बंधा-यांच्या निडल्स काढण्याचे काम सुरू असल्याने नदी वाहती झाली आहे, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. जी. नान्नोर यांनी सांगितले.