विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. यामध्ये फळबागांचे नुकसान झाले. येथील मंडल कार्यालयावर झाड पडल्याने काही कागदपत्रे भिजली आहेत.
सोमवारी चार वाजता कोळगाव, पिंपळगाव पिसा, कुकडी साखर कारखाना व घारगाव परिसरात अचानक जोरदार पाऊस झाला. कोळगाव येथे वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने झाडे उन्मळून पडली. लिंबूसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही झाडे अक्षरशः उन्मळून पडली आहेत. कोळगाव येथे दोन तासात ५६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
मंगळवारी कृषी सहायक, कामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे केले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. कोळगाव येथील मंडल कृषी कार्यालयावर झाड पडल्याने छताचे नुकसान झाले. छताला गळती लागल्याने काही महत्त्वाची कागदपत्रे भिजली. तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी कार्यालयाची पाहणी करून माहिती घेतली.
---
सोमवारी दुपारी कोळगाव येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात येईल. मंडल कृषी कार्यालय इमारतीचे नुकसान झाले असून, त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे.
-पद्मनाभ म्हस्के,
तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा
---
१६ कोळगाव पाऊस
कोळगावच्या कृषी मंडल कार्यालयावर कोसळलेले झाड.