अहमदनगर: परतीच्या पावसाने मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यात सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात मोठा पाऊस झाला. २० ते ३० मिनिटे सुरू असलेला हा पाऊस रात्री साडेआठच्या सुमारास थांबला. पावसाने हवेत गारवा निर्माण झाला.
दिवसभर ऊन असले तरी पावसाचे वातावरण नव्हते. मात्र सायंकाळी अचानक पावसाला सुरवात झाली. शिर्डीमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नेवासा व पाचेगाव परिसरातही पावसाने झोडपले. राहुरी, अकोले तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. नगर तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला.
नगर शहरातही अर्धा तास पाऊस सुरू होता. या पावसाने आणखी पिकांचे नुकसान झाले आहे. पाण्यात बुडालेली पिके काढण्यात शेतकरी व्यस्त असताना मंगळवारच्या पावसाने आता आणखी शेतात पाणी साचले आहे. दरम्यान परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने दोन ते तीन दिवसात मान्सून माघारी जाईल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.