पाथर्डी : ऊसतोड मजूर व मेंढपाळांचे प्राबल्य असलेल्या तालुक्यातील भांडेवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताहात शुभमंगल सावधानचा गजर घुमला. सप्ताहाच्या सांगताप्रसंगी लक्ष्मण रूपनर यांचा मुलगा घुळाजी व देवराव वाघमोडे यांची मुलगी जिजाबाई यांच्यावर अक्षतांचा वर्षाव करीत त्यांच्या लग्नगाठी बांधून समाजासमोर आदर्श ठेवण्यात आला.तालुक्यातील भांडेवाडी हे उसतोड मजूर व मेंढपाळांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथील ग्रामस्थ टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षातून सहा महिने बाहेरगावी असतात. भांडेवाडी ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे याच गावातील दारिद्र्यरेषेखालील दगडू बापू महारनोर यांनी आपले घर पाडून शाळेला जागा दिली. जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामात ग्रामस्थांनी श्रमदान केले. तसेच शाळेला लागणाऱ्या विविध साहित्यासाठी आतापर्यंत जवळपास तीन लाख रूपयांची लोकवर्गणी दिली. गावात सन २००२ पासून अखंड हरिनाम सप्ताह होत आहे.सप्ताहात एखाद्याचे तरी लग्न व्हावे, अशी ग्रामस्थांची इच्छा होती. सप्ताहात लग्न झाल्यास ग्रामस्थांना जेवण देणे, मांडव टाकणे, वाद्य लावणे यासाठी होणारा खर्च वधू पित्याला करावा लागणार नाही. तसेच डीजेचा धांगडधिंगा, रूसवे फुगवे या सर्वांना आळा बसेल, अशी रोहिदास ठोंबरे, नाना ठोंबरे,विठ्ठल ठोंबरे, नवनाथ ठोंबरे, रावसाहेब ठोंबरे,कोंडिबा नरोटे, प्रभाकर डमाळे, गोपीनाथ गुंजकर, दशरथ नरोटे, संजय ठोंबरे,अशोक रूपनर, अंकुश ठोंबरे, रामकिसन ठोंबरे, पोपट हंडाळ आदी ग्रामस्थांची इच्छा होती. त्यानुसार भांडेवाडी गावात हरिनाम सप्ताहात हा विवाह सोहळा होऊन ग्रामस्थांची इच्छापूर्ती झाली. हरिनाम सप्ताहात लग्न होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ग्रामस्थही या अनोख्या लग्न सोहळ्याने हरखून गेले होते.
हरिनाम सप्ताहात बांधली लग्नगाठ : भांडेवाडीतील वधू-वरांचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:22 AM