अहमदनगर : नगर शहरात आजपासून (दि़१) वाहनचालकांना हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती आहे़ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले़पोलिसांनी हेल्मेट सक्ती जाहीर करताच शुक्रवारी मोटारसायकल चालकांनी दुकानांमध्ये हेल्मेट खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती़ दिवसभरात लाखो रूपयांच्या हेल्मेटची विक्री झाली़ अपघतांमुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी वाहतूक शाखेने १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे़ विना हेल्मेट कुणी मोटारसायकल चालविताना आढळून आला तर ५०० रूपयांचा दंड ठोठविण्यात येणार आहे़ हेल्मेट सक्तीसह सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाºयांवरही कारवाई करण्यात येणार आहे़२०१६ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती़ या नियमाची मात्र वाहचालकांसह पोलिसांकडूनही अंमलबजावणी झाली नाही़ आता मात्र पुन्हा वाहतूक शाखेने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे़ अपघातात डोक्याला मार लागून बहुतांशी जणांचा मृत्यू होतो़ अपघात झाल्यानंतर वाहनचालकाच्या डोक्यात हेल्मेट असेल तर डोक्याला जास्त इजा होत नाही़ त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी असतो़शनिवारी हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीसाठी चौकाचौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे़
नगरमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:53 PM