राहुरी :आपल्या देशात पाच एकरपेक्षा कमी शेती क्षेत्र असणारे शेतकरी 80 टक्के आहे. वाढणार्या लोकसंख्येने धारणक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. या सर्व लहान शेतकर्यांना उपयोगी पडेल असे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्याला तयार करावे लागेल. लहान शेतकर्यांचे गट एकत्र येवून शेतकरी शेतमाल कंपनीच्या माध्यमातून, शेती उद्योगाच्या माध्यमातून त्यांचे भविष्य बळकट होवू शकेल. सरकारने आत्मनिर्भर भारत या योजनेमध्ये कृषि क्षेत्रासाठी भरीव तरतुद केली आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीनेच स्मार्ट पध्दतीने शेती केली तरच शेतकरी उद्योजक बनवून खर्या अर्थाने आत्मनिर्भर होईल असे प्रतिपादन कुलगुरु के.पी. विश्वनाथा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र या प्रकल्पांतर्गत आत्मनिर्भर भारत होण्यासाठी कृषि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन दि. 12 सप्टेंबर, 2020 रोजी करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु के.पी. विश्वनाथा बोलत होते. यावेळी मुख्य वक्ते म्हणुन टेक्नोरायर्ट्स प्रा.लि., पुणेचे व्यवस्थापकीय संचालक इंजि. मकरंद पंडित, यंटेलिमेंट गृपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक तसेच रुबीस्केप कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. प्रशांत पानसरे हे होते. याप्रसंगी ओमान येथील इनोव्हेशन सेंटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्दूल्ला मेहरुकी, कार्यक्रमाचे निमंत्रक नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या कास्ट प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख, कार्यक्रमाचे सह आयोजक सचिव ब्रेनस्मार्ट सोलुशन, पुणेचे इंजि. अविनाश देशमुख, कार्यक्रमाचे सह निमंत्रक सुनिल गोरंटीवार, आयोजक सचिव मुकुंद शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कुलगुरु के.पी. विश्वनाथा पुढे म्हणाले की कृषिच्या विद्यार्थ्यांना भविष्यात कृषि उद्योजक होण्यासाठी इनक्युबेशन सेंटर्सची फार मोठी मदत होणार आहे. बाजाराचे सर्वेक्षण आणि सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळाले तरी सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम व खुप कष्टांची गरज यशस्वी शेती उद्योजक बनण्यासाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रभात कुमार आत्मनिर्भर भारत या विषयावर बोलतांना म्हणाले की आपल्या देशात सहा लाख गावे असून 46 टक्के भारतीय अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागावर आधारीत आहे. स्वावलंबन हेच अधिष्ठान मानुन गावांचा नियोजनबध्द विकास व्हायला हवा. नविन तंत्रज्ञान ग्रामीण भागात तळापर्यंत पोहचले तर सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत 13 ते 14 टक्के असलेला कृषिचा शेअर वाढण्यास मदत होईल. अब्दुल्हा मेहरुकी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की ओमानमधील वातावरण खुप उष्ण असून ती आमच्यासाठी मोठी समस्या आहे. भारताच्या सहकार्याने ओमानमध्ये शेती व मत्स्य व्यवसयामध्ये अन्न सुरक्षीततेसंबंधी वेगवेगळे प्रकल्प सुरु असून शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यामुळे या देशात रोजगाराच्या खुप संधी निर्माण झाल्या आहेत. इंजि. प्रशांत पानसरे नविन भारताला आकार देण्यासाठी कृषि तंत्रज्ञानाची मदत या विषयावर मार्गदर्शनात म्हणाले की भारतात इंटरनेट वापरणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या कोव्हीड-19 परिस्थितीमुळे आपले आयुष्य पुर्ण बदलुन गेलेलेे आहे. यातुनच प्रत्येक काम मग ते शेतातील असो किंवा उद्योगधंद्यातील असो त्यामध्ये यांत्रिकीकरणावर जास्त भर देण्यात येवू लागला आहे. शेतीतील सर्व कामात ड्रोन, मोबाईल अॅप्लीकेशन, सेंसर्स इ. डीजीटल माध्यमांचा वापर केल्यास ग्रामीण भागाचा विकास होईल. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग नियंत्रीत तापमानातील शेती, मार्केट लिंकेजसच्या मदतीने तसेच हवामान अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेवून करावी लागतील.
इंजि. मकरंद पंडित कृषि तंत्रज्ञानात इनक्युबेटर्सची भुमीका या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की शेती क्षेत्रात असलेल्या समस्यांची सोडवणूक तंत्रज्ञानाच्या मदतीने करुन आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. कमी शिक्षण, वेळ, आर्थिक पाठबळाची कमतरता व नाविन्यपुर्ण प्रयोगांचा अभाव यामुळे सध्याच्या परिस्थितीत शेती करणे अडचणीचे ठरु लागले आहे. अटल इनोव्हेशन मिशन ही योजना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसीत करणार्यांना प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ देते. या योजनेच्या सहकार्याने सध्या भारतात असणार्या 140 इनक्युबेटर्सची संख्या येता काही वर्षात आपल्याला दोन हजार पर्यंत वाढवावी लागेल.