कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोना महामारी तीव्र गतीने वाढत असून, अनेक कुंटुंबातील सदस्यांना या महामारीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांना वेळेवर ऑक्सिजन, तसेच इतर आरोग्यविषयक वैद्यकीय सेवा शासनाकडून प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली आहे, तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
कोल्हे म्हणाले, सद्यस्थितीत कोरोनाची विविध लक्षणे दिसत असून, त्यातून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोपरगाव तालुक्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्णांसह नातेवाइकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. हा त्रास कमी होण्यासाठी संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील औद्योगिक वापरासाठी असलेला ऑक्सिजन प्लांट गेल्या काही दिवसांपासून बंद होता. सदर प्लांटला वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठीची परवानगी मिळालेली असून, सद्यस्थितीत कार्यान्वित झालेला आहे. या प्लांटला लागणारा लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा हा आवश्यकतेप्रमाणे सुरळीत व्हावा, यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे, अशी विनंतीही कोल्हे यांनी केली आहे.