निराधार युवकांना १२ वीपासून पुढील शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी नामांकित शैक्षणिक संस्था, खासगी आणि उद्योग क्षेत्रालाही मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका कुटुंबातील कर्ता व्यक्ती अथवा आई- वडील दोन्ही गमावणाऱ्या मुलांना बसण्यास सुरवात झाली आहे. त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. विशेषतः तरुणांसमोर पुढील उच्च शिक्षण आणि रोजगाराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वेळेवर साहाय्य न मिळाल्यास अनेकांचे शिक्षण खंडित होण्याची शक्यता आहे. ही गरज ओळखून हा विशेष कोविड मदत प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने मानसिक आधार, निवास, भोजन, समुपदेशन, शैक्षणिक खर्च आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. ती सर्व समावेशक मदत स्वावलंबन योजनेद्वारे मिळवून देण्याचा युवानचा प्रयत्न आहे.