केडगाव : फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन सध्या महाविकास आघाडी सरकार करत आहे. केंद्राचे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील पैसे व्याजाने घेऊन त्यांनी रुग्णवाहिका घेऊन हे सरकार शोबाजी करीत आहे. इतकी लाचारी आघाडी सरकारने चालविली आहे. याचा सारा हिशेब घेऊन आगामी निवडणुकीत येणार आहे, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.
नगर शहर बाह्यवळण मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात रविवारी वाळुंज येथे विखे यांच्या हस्ते झाली. यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. ४० किलोमीटर अंतराच्या १ हजार २६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.
विखे म्हणाले, इतके वर्षे राजकारण पाहतो. मात्र, आघाडी सरकार आल्यापासून प्रथमच डीपीचे उद्घाटन करायला मंत्री येतात. १० लाखांच्या कामासाठी १० तास भाषणे ठोकतात. महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत ज्या कामांची भूमिपूजने केली ती फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. याचा हिशेब घेऊनच आम्ही आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत. दुसऱ्यांची कामे आपल्या नावावर खपविण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत. जाहिरातबाजी, शोबाजी करण्यात आम्ही कमी पडतो. रेमडेसिविर इंजेक्शनचा साधा फोटो काढला तरी आमच्या वाट्याला कोर्टबाजी आली. मात्र, जिल्ह्याचे राजकारण जाहिरातबाजीवर चालत नाही. त्यासाठी काम करावे लागते. केंद्र सरकारने १४ व्या वित्त आयोगातील जो निधी वाटला त्या निधीवर या सरकारने व्याजाने पैसे घेऊन रुग्णवाहिका घेतल्या आणि त्याची शोबाजी सुरू केली. इतकी लाचारी या सरकारने केली आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी कर्डिले, पाचपुते, जगताप यांचीही भाषणे झाली.
यावेळी सर्वश्री अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, रवींद्र कडुस, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, सुरेश सुंबे, बाळासाहेब दरेकर, गहिनीनाथ दरेकर, अनिल करांडे आदी उपस्थित होते.
---
नगर-करमाळा मार्गाचे पुनर्मूल्यांकन
१५ सप्टेंबरपर्यंत एक संयुक्त समितीमार्फत नगर-करमाळा मार्गातील जमिनीचे पुनर्मूल्यांकन होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, अशी माहिती विखे यांनी दिली.
---
जिल्हा परिषद फक्त विकायची राहिली..
विखे यांनी नगर जिल्हा परिषदेच्या कारभारावरही टीका केली. ते म्हणाले, जिल्हा परिषद फक्त विकायची बाकी असून, ती दहा टक्क्यांची दुकानदारी झाली आहे. प्रत्येक कामासाठी टक्केवारी चालते. त्यांच्या निधीतून सध्या झालेली कामे पाहा. त्यांची अवस्था पाहा. किती खायचे याचे लिमिटच नाही. मुळासकट मातीही खाल्ली जात आहे.
----
फोटो आहे......................