अहमदनगर : नगर तालुक्यातील हनी ट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेली महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस मात्र या दोघांना दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेले बापू सोनवणे व सचिन खेसे यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. नगर तालुक्यातील एका व्यावसायिकाला जखणगाव येथील बंगल्यात बोलून त्याचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करत खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिचे साथीदार अमोल मोरे व बापू सोनवणे यांना अटक करत गुन्हा दखल केला. दरम्यान, अशाच पद्धतीने या महिलेच्या टोळीने एका क्लासवन अधिकाऱ्यालाही ब्लॅकमेल करत खंडणी मागितल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुका पोलिसांनी सचिन खेसे, सागर खरमाळे व महेश बागले यांच्यासह सदर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करत खेसे याला अटक केली. या चारही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पोलीस सदर महिला व मोरे यांना दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून त्यांची पुन्हा पोलीस कोठडी मागणार आहेत. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
...............
‘त्या’ बंगल्यात अनेकांचे वस्त्रहरण
जखणगाव येथील आलिशान बंगल्यात ३० वर्षीय महिला व तिच्या टोळीने अनेकांचे वस्त्रहरण करत त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून पैसे उकळल्याची चर्चा आहे. या संदर्भातील काही नावेही पोलिसांना प्राप्त झाली आहेत. बदनामीच्या भीतीपोटी मात्र तक्रारदार पुढे येत नसल्याने पोलिसांचा नाइलाज आहे.
..............