जामखेड : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेडची जागा बिनविरोध केली. कर्जतच्या जागेसाठी ४५ ठराव असलेले लोक विरोधकांनी सोबत नेले. मतमोजणीत ते ३६ कसे झाले हे कोडे त्यांना अजूनही उमजेना. जिल्हा बँक निवडणुकाचा हा ट्रेलर होता. नगर परिषद निवडणुकीत पूर्ण पिक्चर दाखवू, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.
जामखेड येथे शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
विखे म्हणाले, केंद्र सरकारकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. मात्र, त्याची प्रसिद्धी केली नाही. परंतु, येथील आमदार निधी मीच आणला, असे सोशल मीडियावर सांगत आहेत. जे काम आपण केले नाही, त्याचे श्रेय घेऊ नये. मागील वर्षभरात आमदारांनी एकही काम केले नाही. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या कामांचे उद्घाटन ते करीत आहेत.
यावेळी खासदार निधीतून जामखेड तालुक्याला दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण विखे यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्रवीण सानप यांनी केले. मनोज कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ राळेभात, विठ्ठल राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवक अध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे उपस्थित होते.