संगमनेर (जि. अहमदनगर) : धर्मगुरू बनण्यासाठी स्वित्झर्लंड देशातून पुणे विद्यापीठात आलेल्या फादर हर्मन बाकर यांनी धर्मशास्त्रात पदवी मिळविली. मात्र, त्यानंतर पुढील साठ वर्ष त्यांनी दुष्काळ निवारणासाठी वाहून घेतले. संगमनेर, अकोले तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मोठे काम केले. माथा ते पायथा, इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पाणी चळवळीचे ते खऱ्या अर्थाने ‘फादर’ ठरले.
फादर हर्मन बाकर यांचे १४ सप्टेंबरला वयाच्या ९७ व्या वर्षी स्वित्झर्लंड येथे निधन झाले. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२४ रोजी स्वित्झर्लंड येथे झाला. वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजे १९४८ साली ते स्वित्झर्लंड सोडून भारतात आले. पुणे विद्यापीठात धर्म शिक्षणास सुरुवात केली. धर्मगुरू बनण्याची त्यांची इच्छा होती. शिक्षण सुरू असताना महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहिली व पाणलोट विकासासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यावेळचे त्यांचे सहकारी क्रिस्पिनो लोबो व डॉ. मनीषा मार्सेला यांना सोबत घेत बाकर यांनी ‘वॉटर’ या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारत आणि जर्मनी यांच्यात करार घडविण्यात मोलाची भूमिका बजावली. ‘नाबार्ड’च्या सहकार्याने इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास या कार्यक्रमाची सुरुवात केली. नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, श्रीरामपूर या तालुक्यात त्यांनी मोठे काम उभे केले. श्रमदानाची सुरुवात केली. याच काळात त्यांचा संपर्क स्व. भाऊसाहेब थोरात यांच्याशी आला. पुढे त्यांनी अनेक वर्ष सोबत काम केले.
प्रवरानगर, संगमनेर भागात नालाबडिंग, पाझरतलाव, नवीन विहिरी खोदणे, जुन्या विहिरींची दुरुस्ती व खोलीकरण करणे अशी कामे फादर हर्मन बाकर यांनी या परिसरात राबविली होती. श्रीरामपूर येथे बेरोजगार तरुणांसाठी झेवियर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. संगमनेर-अकोले तालुक्यात सोशल सेंटरच्या माध्यमातून तब्बल ५० सामुदायिक पाणी पुरवठा योजना सुरू केल्या. चास-पिंपळदरी, कळस खुर्द, पैठण, कळस बुद्रूक, म्हाळादेवी, चितळवेढे (अकोले तालुका), पिंपरणे, मनोली, वडगावपान, जाखुरी, देवगाव, पिंपळगाव कोंझिरा, संगमनेर (ता. संगमनेर) या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी, मेंढवण, म्हसवंडी या ठिकाणी त्यांनी केलेले काम हे राज्यासाठी दिशादर्शक ठरले. २००९ साली ते स्वित्झर्लंडला परत गेले.
------------------
देशाच्या कृषी धोरण समितीवरही काम
स्वित्झर्लंडहून भारतात येत असता फादर हर्मन बाकर यांनी महिनाभराच्या बोटीच्या प्रवासात उत्तम इंग्रजी आत्मसात केली. पुण्याला येऊन धर्मशास्त्रात पदवी मिळवली. मराठी व संस्कृत शिकले. त्यांना १४ भाषा अवगत होत्या. तत्कालीन जर्मन वित्त मंत्री यांनी फादर बाकर यांना फेडरल क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरीट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतात येऊन प्रदान केला. महाराष्ट्र सरकारने १९९४ मध्ये ‘कृषी भूषण’ १९९६ मध्ये ‘वनश्री’ आणि २०१० मध्ये ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबतच्या डॉ. स्वामिनाथन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.