अहमदनगर : शेवगाव येथील ऊस दरासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर गोळीबार योग्य नाही़ गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले.शेवगाव तालुक्यातील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात जखमी शेतक-यांची खोत यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खोत म्हणाले, अन्नदात्या शेतक-यांवर लाठीचार्ज करणे योग्य नाही़ एफआरपीप्रमाणे उसाला भाव देण्याची शेतक-यांची मागणी आहे. शेतक-यांनी या मागणीसाठी आंदोलन केले. त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेचे कुणीही समर्थन करणार नाही, असे सांगून त्यांनी पोलीस प्रशासनावर निशाणा साधला. मात्र राज्याला स्वतंत्र गृहमंत्री देण्याच्या विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीबाबत पत्रकारांनी छेडले असता गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम असल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले.ऊस दरासाठीच्या आंदोलनात सहभागी शेतक-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येत्या आठ दिवसांत प्राप्त होईल, याबाबत योग्य तो निर्णय सरकार घेईल. तसेच ऊस दराबाबत येत्या २३ नोव्हेंबर रोजी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतक-यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आल्याचे खोत यावेळी म्हणाले.
शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवरील गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी- सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 6:47 PM