अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मागील आर्थिक वर्षाचा ९९ टक्के निधी खर्च झाला असून, खर्चाच्या बाबतीत नगर जिल्हा नाशिक विभागात अव्वल ठरला आहे. चालू आर्थिक वर्षातही जिल्ह्यासाठी ५८८ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून, या निधी खर्चाचे योग्य नियोजन करा व निधी विहित मुदतीत खर्च करा, अशा सूचना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, संग्राम जगताप, स्नेहलता कोल्हे, मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे आदी यावेळी उपस्थित होते.पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी २०१७-१८ साठी ५६९ कोटी ८६ लाख ७५ हजार रूपयांपैकी ५६३ कोटी ५७ लाख ७७ हजार (९८ टक्के) एवढा निधी खर्च झाला आहे. या खर्चात नगर जिल्हा विभागात अव्वल क्रमांकावर असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात (सन २०१८-१९) ५८८ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यातील अंगणवाड्या व शाळा खोल्यांच्या निधी मर्यादेची अट काढून जास्तीत जास्त निधीचा ठराव राज्याला पाठवला आहे. रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्त्यांची रखडलेली कामे आॅक्टोबरअखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
२४ देवस्थानांना क दर्जाहासोबा देवस्थान (सडे, ता. राहुरी), शृंगेश्वर मंदिर देवस्थान (संवत्सर, ता. कोपरगाव), श्री मारुती मंदिर ट्रस्ट (सावरगाव, ता. पारनेर), ओम गुरुदेव जंगली महाराज मेरुदंड आश्रम देवस्थान (इमामपूर, ता. नेवासा), श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान (नागलवाडी, ता. शेवगाव,) श्री सिध्देश्वर महाराज देवस्थान (लिंपणगाव, ता. श्रीगोंदा), श्री मुदगुलेश्वर मंदिर देवस्थान (आर्वी, ता. श्रीगोंदा), श्री अंबिका माता देवस्थान (वांगदरी ता. श्रीगोंदा), खंडोबा देवस्थान (कौठे बु. ता. संगमनेर), श्री शेषनारायण देवस्थान (कुंभेफळ, ता.अकोले), श्री महादेव व मारुती मंदिर (कुंभेफळ, ता. अकोले), भैरवनाथ देवस्थान (कोंभळी, ता. कर्जत), श्री पावन मारुती देवस्थान (शिंगवे केशव, ता. पाथर्डी), श्री हंगेश्वर देवस्थान (हंगेवाडी, ता. श्रीगोंदा), श्री क्षेत्र एकमुखी दत्त देवस्थान (जोर्वे ता. संगमनेर), श्री बिरोबा मंदिर देवस्थान (धांदरफळ खुर्द ता. संगमनेर), श्री नागनाथ महाराज देवस्थान (हिरडगाव ता. श्रीगोंदा), श्री चांडैश्वर देवस्थान (चांडगाव ता. श्रीगोंदा), श्री सिध्देश्वर(महादेव) महाराज देवस्थान (आढळगाव ता. श्रीगोंदा), श्री केदारेश्वर देवस्थान (सातेफळ ता. जामखेड), श्री शनि मंदिर गोगलगाव (ता. राहाता), रामगिरीबाबा देवस्थान (पाथर्डी) व दैवदैठण देवस्थान (जामखेड) या २४ यात्रास्थळांना क वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला आहे.