अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा बुधवारी उच्चांक झाला. २४ तासात तब्बल ४,४७५ जणांची कोरोना चाचणी प़ाॅझिटिव्ह आली. गत आठवड्यात हीच रुग्णसंख्या चार हजार दोनशे पर्यंत गेली होती. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच विक्रमी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चिंता व्यक्त केली आहे. सध्या जिल्ह्यात दररोज ३ हजार ते ३ हजार ५०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र १ मे रोजी प्रथमच कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ४ हजार २१९ इतकी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या निम्म्यावर घटली होती. मात्र बुधवारी रुग्णात वाढ झाली असून तो मार्च २०२० पासून ते आतापर्यंतचा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यात बुधवारी ३,१०३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णसंख्या वाढल्याने सध्या सक्रिय रुग्णांची संख्याही २५ हजार पार गेली आहे. बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १,०५३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २,३८५ आणि अँटीजेन चाचणीत १,०३७ रुग्ण बाधित आढळले.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या आता १ लाख ९३ हजार ६४२ इतकी झाली आहे.