शासकीय आकडेवारीनुसार १३ सप्टेंबर (२०२१) पर्यंत संगमनेर तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १ लाख ७८ हजार ४८४ डोस देण्यात आले. यात १ लाख २१ हजार २३२ नागरिकांनी पहिला डोस घेतला. तर ५७ हजार २५२ नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर काही खासगी रुग्णालयांमध्येदेखील लसीकरणाला सुरूवात झाली. अनेकदा शासकीय रुग्णालयांमध्ये लस लवकर उपलब्ध होत नसल्याने तसेच काही ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत असल्याने त्यावेळी अनेकांनी खासगी रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घेतले होते. खासगी रुग्णालयांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात लसीकरण होते आहे. त्याबाबत आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. शासकीय आणि खासगी असे मिळून संगमनेर तालुक्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे, असे पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सांगितले.
------------------
ग्रामीण रुग्णालय (घुलेवाडी, साकूर), शहरातील कुटीर रुग्णालय, पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी पुरेशी लस उपलब्ध असून लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येतो आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर पूर्वीसारखी गर्दी आता होत नाही.
-डॉ. सुरेश घोलप, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती संगमनेर
-----------------------
शहरात प्रभागनिहाय लसीकरण
घुलेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या पुढे दोन पावले टाकत लसीकरणाच्या रांगा थांबविण्यासाठी उपाययोजना केली. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन लसीकरणाचा ‘घुलेवाडी पॅटर्न’ प्रभावी ठरला. तसेच शहरातदेखील आरोग्य विभागाच्या वतीने प्रभागनिहाय लसीकरण करण्यात आले.
------------------
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल टास्क फोर्सने सूचित केल्यानंतर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत असल्याने केंद्रावर होणारी गर्दी टळली आहे.
डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर उपविभाग
----
star 1173