केडगाव : तालुक्यातील डोंगरगण येथे गावातील मुख्याध्यापकाला सहायक पोलीस निरीक्षकाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी मतदान प्रक्रियेवर काही काळ बहिष्कार टाकला होता. त्यामुळे दोन तास मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली होती. अखेर पोलीस अधिकाऱ्याच्या माफीनाम्यानंतरच ग्रामस्थ शांत झाले.
डोंगरगणध्ये मुख्याध्यापक असणारे अजय भुतकर हे वृद्ध आईस मतदानासाठी मतदान केंद्रात घेऊन जात होते. त्यावेळी एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी त्यांना हटकले व मारहाण केली. गावातील मुख्याध्यापकास मारहाण झाल्याने गावातील दोन्ही आघाडीमधील कार्यकर्ते व गावकरी संतप्त झाले. त्यांनी लगेच मतदानाची प्रक्रिया बंद करून मतदानावर बहिष्कार टाकला. जोपर्यंत बोरसे माफी मागत नाही तोपर्यंत मतदान सुरू होणार नाही, असा गावकऱ्यांनी पवित्रा घेतल्याने प्रकरण चिघळले.
गावकरी एकत्र येत बोरसे यांच्या निषेधाच्या घोषणा देऊ लागले. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही गावकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर बोरसे यांनी सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त केल्याने तणाव आणि दोन तासांनंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली.