लोकमत न्यूज नेटवर्क
शेखर पानसरे
संगमनेर : संगमनेरातील जुने बसस्थानक पाडून त्या जागी भव्य असे बसस्थानक, व्यापारी संकुल उभारण्यात आले. या बसस्थानकात हिरकणी कक्ष सुरू झाला खरा, परंतु नेहमीच कुलूपबंद असलेल्या या कक्षाचा वापर आता स्टोअर रूम म्हणून केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १० मे २०१३ पासून राज्यभरातील बसस्थानकांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर राज्यातील सर्वच बसस्थानकांवर हिरकणी कक्ष उभे करण्यात आले. संगमनेर बसस्थानकातील हिरकणी कक्ष नेहमीच बंद असतो. त्यामुळे स्तनदा मातांची कुंचबणा होते आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी (दि. २९) रात्री सव्वाआठच्या सुमारास बंद असलेल्या या कक्षाच्या चावीसंदर्भाने बसस्थानकातील चौकशी कक्षात विचारणा केली. साधारण दहा मिनटांनी हा कक्ष खोलून देण्यात आला. कक्षात प्रवेश केला असता त्यात बसस्थानकात विक्री होत असलेले खाद्यपदार्थ तसेच साफसफाई करण्याच्या वस्तू व इतरही सामान ठेवल्याचे आढळून आले. फरशीवर कचरा तर भिंतीवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून मातांना आपल्या बाळाला स्तनपान करताना बसण्याची कुठलीही सोय नाही.
हिरकणी कक्षाबाहेर माता व लहान बाळाचा फोटो लावावा. माता व तिच्या लहान बाळाव्यतिरिक्त या कक्षात कुणालाही प्रवेश दिला जाऊ नये. महिला प्रवाशांना कक्षाची माहिती व्हावी, याकरिता उद्घोषणाही करणे गरजेचे आहे. कक्षात खुर्च्या, सतरंजी व इतरही सोय असावी. असे असताना मात्र, संगमनेर बसस्थानकातील या कक्षाचा वापर स्टोअर रूम म्हणून होतो आहे. स्तनदा मातांनी याचा लाभ घ्यावा, असा जनजागृती करणारा फलक दिसून येत नाही. हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेबाबत आगार व्यवस्थापक नीलेश करंजकर यांच्याशी प्रतिक्रियेबाबत संपर्क साधला असता, हिरकणी कक्षाची स्वच्छता केल्याचे त्यांनी सांगितले.
----------
राज्यभरातील बसस्थानकांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्याचा उपक्रम खरोखर चांगला आहे. संगमनेर बसस्थानकातील हिरकणी कक्षात लागणाऱ्या वस्तू परफेक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्तनदा मातांची गैरसोय टळेल.
- सुनीता कोडे, संस्थापक अध्यक्षा, परफेक्ट फाउंडेशन, संगमनेर