अहमदनगर : भिंगारची ओळख आणि इतिहासाची साक्षीदार असलेली भिंगार वेस अखेर शुक्रवारी नामशेष करण्यात आली़ चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसात वेशीचा काही भाग ढासाळला होता़ तर उर्वरित भागालाही भेगा पडल्या होत्या़ त्यामुळे ही वेस धोकादायक बनली होती़ मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या प्रवाशांना वेशीतूनच जावे यावे लागत होते़ त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी छावणी परिषदेने गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन वेशीचा उर्वरित भाग काढून टाकला़ गेल्या अनेक दिवसांपासून ऊन-पावसात उभी असलेली आणि अनेक वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार असलेली वेस आज नामशेष झाली़ वेशीचा काही भाग पडल्यानंतर छावणी परिषदेने उर्वरित भागही पाडण्यास सुरुवात केली होती़ मात्र, याला काही स्थानिक नागरिकांनी विरोध केला़ यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती़ धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी वेस पाडण्यास हिरवा कंदील दिला़ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता छावणी परिषदेने वेस पडण्यास सुरुवात केली. पहाटे चारपर्यंत काम सुरु होते. भिंगार शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने रात्री उशीरापर्यंत वाहने ये-जा करतात़ त्यामुळे वेस पाडण्यास वारंवार अडथळा येत होता़
ऐतिहासिक भिंगार वेस अखेर नामशेष
By admin | Published: August 29, 2014 11:29 PM