संगमनेर (अहमदनगर) : हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात कंपनीला निवेदन दिले होते. मात्र, निवेदनाची कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर रस्ते आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (दि. १७) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझा कामगार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप लबडे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस काम बंद आंदोलन आणि त्यानंतर शुक्रवारपासून उपोषणाचा मार्ग कर्मचाऱ्यांनी अवलंबला आहे. निलेश सरोदे, सागर मुंगसे, संतोष पोखरकर, किसन वाळे, विलास धात्रक, विवेक वाळे हे कर्मचारी उपोषणाला बसले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे. असे त्यांनी सांगितले. २०१७ पासून काम करताना कर्मचाऱ्यांची पगारवाढ झालेली नाही. त्यासंदर्भात १० जानेवारी २०२३ ला निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांची मार्च महिन्यात पगारवाढ करण्यात येईल, असे आश्वासन मिळाले होते; परंतु आजपर्यंत कोणीतही पगारवाढ झालेली नाही. कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम मिळाला पाहिजे. आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.