केडगाव : आदर्श गाव हिवरे बाजार येथील कोरोना ग्रामसुरक्षा समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या सहकार्यातून हिवरे बाजारमधील एकूण ३०३ कुटुंबातील १४०४ व्यक्तीची कोरोना तपासणी केली आहे. या तपासणीत हिवरेबाजार येथील एकही व्यक्ती आजारी आढळली नाही. तपासणीवेळी सर्वसाधारण ९० अंश ते ९८ अंश तापमान व्यक्तींना आढळून आले. एकाही कुटुंबात आजारी व्यक्ती आढळली नाही. हे ग्रामस्थ सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे. २२ मार्च २०२० पासून गावाने स्वत:ची आचारसंहिता तयार केली होती. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण गावाची तपासणी करता आली. हिवरे बाजारमध्ये बाहेरून आलेल्या एकूण ८६ व्यक्तींना घरातच क्वारंटाईन केले होते. सध्या नव्याने आलेल्या १२ व्यक्तींना क्वारंटाईन करून प्रशिक्षण केंद्रावर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. किराणा, दूध व शेतीमाल व बाहेरील ये जा यांचे व्यवस्थित नियोजन करून सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे कोरोनाचा गावात शिरकाव झाला नाही. यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.
हिवरे बाजारने केली १०० टक्के ग्रामस्थांची कोरोना तपासणी; एकही व्यक्ती आजारी आढळली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:03 AM