श्रीरामपूर : नगरपालिकेने शहरवासीयांच्या जनआरोग्य विम्यासाठी अडीच कोटी रुपयांची केलेली तरतूद केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करत उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून अर्थसंकल्पाची प्रवेशद्वारावर होळी करण्यात आली. आरोग्य विम्यातून कोरोनामुळे मयत झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील लाभ मिळू शकला नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली.
उपनगराध्यक्ष ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक रितेश रोटे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष युवराज फंड यांनी हे आंदोलन केले.
कोरोनाने शहरात भयंकर स्वरूप धारण केले आहे. मात्र, नगरपालिका प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवक यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढावा, अशी सतत मागणी केली होती. कोरोनाने आजारी पडले तर त्या विम्याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना चांगल्या रुग्णालयात इलाज मिळेल, असा त्यामागे उद्देश होता. पालिकेच्या अर्थसंकल्पात त्यामुळे अडीच कोटींची तरतूद केली गेली. परंतु, ही तरतूद केवळ कागदावरच राहिली आहे. मागील आठवड्यात पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला पालिका सत्ताधारी व प्रशासन कारणीभूत असून, केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत, असा आरोप ससाणे यांनी केला.
नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले असते तर त्यांना वेळीच उपचार मिळाले असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला पालिका जबाबदार आहे. यापुढे कोरोना काळात काम करण्याचे मनोधैर्य कर्मचाऱ्यांमध्ये राहिले नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली.
_____
फोटो ओळी : आंदोलन
पालिकेच्या आरोग्य विम्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर होळी केली.