अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये, यासाठी दुकानदारांमार्फत किराणा घरपोहोच केला जाणार आहे. महापालिकेकडून तसे नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.बंद काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. नगर शहरातील मध्यवर्ती भागात होलसेल विक्रेते आहेत. त्यांना शहर व परिसरातील रिटेलरांना माल पुरविण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. महापालिका ही वाहतूक करणा-यांना ओळखपत्र देणार आहे. हे ओळखपत्र असलेले वाहन व व्यक्तीच फक्त रस्त्यावर जाऊ शकतील. रिटेल सोशल मीडियाव्दारे आपली मागणी होलसेलरकडे करतील. त्यानुसार ते रिटेलरचा माल पॅक करून तो वाहनातून त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचत करतील. रिटेलर आपल्या भागातील नागरिकांकडून फोनवर यादी मागवून घेतील. त्यानुसार किराणा नागरिकांच्या घरी पोहोच होईल. किराणा घरपोहोच करणायांनाही महापालिकेकडून ओळखपत्र दिले जाईल. हे ओळखपत्र असणारे किराणा घरी पोहोच करण्याचे काम करतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.महापालिकेन चार प्रभाग कार्यालयांना आपल्या भागातील किरणा दुकानदारांची नाव व फोन नंबर, अशी यादी तयार करण्याचा आदेश दिला आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील दुकानदारांचे नाव व मोबाईल नंबर सोशल मिडियावर प्रसिध्द करण्यात येईल. ही यादी प्रभाग अधिकारी, नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी सोशल मीडियाव्दारे लोकांपर्यंत पोहोचवतील. त्यानंतर पुढील काळात किराणा घरपोहोच करण्याची सुविधा करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
घरपोहोच मिळणार किराणा; अहमदनगर महापालिकेचे युध्दपातळीवर नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:38 AM