कर्जत : कर्जत नगरपंचायत आरोग्य विभागाच्यावतीने कर्जत शहरातील घरोघरी जाऊन संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत ११९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांचीही कोरोना टेस्ट केली जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून कर्जत शहर व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. शिवाय काही नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी बाहेर पडत नव्हते. कर्जत तालुक्यातील सर्व नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी कर्जत येथेच येत असल्यामुळे तपासणी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. कोरोना रुग्ण वाढीचा धोका लक्षात घेता कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी घरोघर जाऊन कोरोना टेस्टींग करण्याचा निर्णय घेतला. जो रुग्ण पॉझिटिव्ह असेल अशा रुग्णांच्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी केली जात आहे. शहर व उपनगरात जे युवक व नागरिक विनाकारण फिरत आहेत, त्यांचीही कोरोना टेस्टींग केली जात आहे. शिवाय कर्जत शहर व उपनगरातील ज्या रहिवाशाचा तपासणीसाठी फोन येईल अशा कुटुंबांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे.
कर्जत नगरपंचायतीने घरोघरी जाऊन तपासणी सुरू केल्यामुळे कोरोना केंद्रावर गर्दी होत नाही. यामुळे कोरोनाचा फैलाव रोखला गेला आहे. अनेक कुटुंबांना घरीच सेवा उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. या मोहिमेत २३१ कुटुंबांतील ६८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११९ जण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या अभियानात कार्यालय प्रमुख रवींद्र साठे, आरोग्य विभाग प्रमुख रुपाली भालेराव, आरोग्य विभागाचे कर्मचारी राकेश गदादे, अशोक मोहोळकर, सागर भांडवलकर हे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
११ कर्जत कोरोना
कर्जत नगरपंचायतीच्यावतीने कर्जत शहर व उपनगरात घरोघरी जाऊन कोरोना तपासणी करताना नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी.