जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या अनुषंगाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व लोकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी गावातील आरोग्य पथकाने प्रत्येक घराला भेट देऊन नागरिकांना कोरोना संदर्भात काही लक्षणे आहेत का, याबाबत तपासणी केली.
२८ एप्रिल ते २ मे या कालावधीत हे सर्वेक्षण झाले. या दरम्यान, आरोग्य पथकाने जिल्ह्यातील ७ लाख ८० हजार घरांमध्ये भेट देऊन सुमारे ३८ लाख (९० टक्के) लोकांची तपासणी केली. त्यामध्ये ९८ पेक्षा जास्त ताप असणारे, ९५ पेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असलेले, १०० पेक्षा जास्त पल्स रेट असलेले, अंगदुखी, वास न येणे, चव न लागणे, जुलाब होणे, याशिवाय सर्दी, ताप, खोकला, तसेच तीव्र श्वसन दाह अशी लक्षणे असलेली एकूण २४ हजार ३७२ संशयित लोक आढळले. या सर्वांना पथकाने जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. आतापर्यंत त्यातील ८,७०० जणांनी कोरोना चाचणी केली. पैकी २,७६९ पॉझिटिव्ह सापडले, तर ५,९२८ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या.
--------------
सर्वाधिक पॉझिटिव्ह श्रीगोंद्यातील
आतापर्यंत ज्या ८,७०० संशयित लोकांनी चाचणी केली, त्यापैकी सर्वाधिक ५८१ पॉझिटिव्ह श्रीगोंदा तालुक्यातील आहेत.
-------------
सर्वाधिक रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याचे
सर्वेक्षणात आढळलेल्या एकूण २४,३७२ संशयितांपैकी ७,७७४ जणांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत. याशिवाय ७४१ जणांना तीव्र श्वसन दाहची (सारी) लक्षणे आहेत.
-------
१५,६७५ संशयितांची चाचणी बाकी
सर्वेक्षणात आढळलेल्या एकूण २४,३७२ संशयितांपैकी केवळ ८,७०० जणांनी आपली कोरोना चाचणी केली आहे. अजूनही १५,६७५ संशयितांची चाचणी होणे बाकी आहे. यातही अनेक जण पॉझिटिव्ह आढळण्याची शक्यता आहे.