अहमदनगर : येथील संजयनगर झोपडपट्टीत राहणारी शुभांगी राजू भंडारे हिची ‘होमलेस वर्ल्ड कप’मध्ये भारतीय महिला फुटबॉल संघात निवड झाली आहे़ भारतीय संघात स्थान मिळविणारी शुभांगी ही नगर जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे़‘होमलेस वर्ल्ड कप-२०१९’ ही स्पर्धा इंग्लंडमध्ये २७ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली आहे़ या स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच निवड करण्यात आली़ यात शुभांगीची निवड झाली आहे़ अनेक असुविधा आणि गरिबीवर मात करीत शुभांगीने हे यश मिळवले.या वर्ल्डकपसाठी १ ते २० जुलै या काळात शुभांगीचे नागपूर येथे विशेष प्रशिक्षण होणार आहे़ २१ जुलै रोजी भारताचा फुटबॉल संघ मुंबई येथून एडिनबरो (स्कॉटलंड) ला रवाना होणार आहे. इंग्लंडमधील कार्डिफ आणि वेल्स, या ठिकाणी २७ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.स्नेहालयातर्फे चालविण्यात येणाऱ्या बालभवनची ती विद्यार्थिनी असून, शुभांगी सध्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे़ तिचे वडील राजू हे नगरमधील बसस्थानकात वडा-पाव विकतात तर शुभांगीची आई प्रीती या एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करीत आहेत़ तिला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. शुभांगीची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे या वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिला आर्थिक मदतीची गरज असून, तिला मदत करु इच्छिणाऱ्यांनी स्रेहालयाच्या बालभवन प्रकल्पाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
होमलेस वर्ल्ड कप : नगरची शुभांगी करणार भारताचे प्रतिनिधीत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 3:51 PM