अहमदनगर : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यातील होमिओपॅथी डाॅक्टरांच्या प्रश्नांबाबत एक बैठक आयोजित केली जाईल. त्यामध्ये सर्व प्रश्न सोडविण्याबाबत नियोजन करू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथील शिष्टमंडळाला दिली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी दिली.
याबाबत डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार संग्राम जगताप हेही उपस्थित होते. या शिष्टमंडळात कृती समितीचे डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. अशोक भोजणे, डॉ. रणजित सत्रे, डॉ. विनय गरुड, डॉ. मनीष धवानी, डॉ. नितीन झावरे, डॉ. सुबोध देशमुख, डॉ. पी. एस. आहुजा, डॉ. दीपक दरंदले, डॉ. शंकर आहुजा, डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. संजीव गडगे, डॉ. जगदीश निंबाळकर, डॉ. सुरेंद्र खन्ना आदी उपस्थित होते.
राज्यातील ७५ हजार होमिओपॅथी डॉक्टरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. होमिओपॅथी डॉक्टरांना राज्य सरकारतर्फे शासकीय नोकरी नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांमध्ये आयुष संचालक व एनआरएचएम विभागाचे उपसंचालक यांच्या पूर्वग्रहदूषित भूमिकांमुळे स्थान मिळाले नाही. २०१६ पासून सुरू असलेल्या सीसीएमपी कोर्स डॉक्टरांची रखडलेली नोंदणी प्रक्रिया, १०८ ॲम्बुलन्स न मिळणे या व इतर प्रलंबित मागण्यांबाबत पवार यांच्याशी चर्चा केली, असे डॉ. पवार यांनी सांगितले. याबाबत पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पानंतर मंत्रिगटाची स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे डॉ. पवार म्हणाले.