पाथर्डी : शहरातील बोरूडे वस्ती, खंडोबा माळ, जुना खेर्डा रस्ता या परिसरात कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी पालिकेवर सकाळी अकरा वाजता धडक हंडा मोर्चा काढून नवीन पाईप लाईन टाकण्याची मागणी केली आहे.बोरूडे वस्ती, खंडोबा माळ, जुना खेर्डा रस्ता या परिसरात पाण्याची पाईपलाईन खराब होवून ठिकठिकाणी फुटल्याने तसेच याच पाईपलाईनवर क्षमतेपेक्षा जास्त नळ जोडण्या असल्याने शेवटीच्या टोकाला असलेल्या बोरूडे वस्तीला गेल्या सहा महिन्या पासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील रहिवासीयांनी प्रभागाचे नगरसेवक तसेच पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु तात्पुरत्या स्वरुपात पाण्याचे टँकर पाठवले गेले. टंकरचे पाणी स्थानिक बोअरवेलचे व क्षारयुक्त असल्याने ते पाणी पिण्यालायक नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी सकाळी अकरा वाजता पालिका कार्यालयावर धडक हंडा मोर्चा काढून प्रभागाचे नगरसेवक व पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात सुरेखा बोरूडे, शिला बोरूडे, शारदा बोरूडे, मनिषा, बोरूडे, शैल्ला बोरूडे, अनिता बोरूडे, रोहिणी बोरूडे, रत्नमाला बोरूडे, कुसुम बोरूडे, शोभा बोरूडे, अचार्ना बोरूडे या महिला सहभागी झाल्या होत्या. नगराध्यक्ष डॉ मृत्यूजय गर्जे यांनी येत्या पाच दिवसांत नवीन पाईपलाईनचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
पाथर्डीत पाण्यासाठी पालिकेवर हंडा मोर्चा : नवीन पाईप लाईन टाकण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 7:07 PM