अहमदनगर : नगर- मनमाड रोडवरील झोपडी कँटीन परिसरात ‘लोकमत’मधील कर्मचारी रामनाथ बडे यांना एक पाकीट सापडले. त्या पाकिटात नऊ हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. मात्र, बडे यांनी संबंधित व्यक्तीला फोन करून त्यांची कागदपत्रे आणि नऊ हजार रुपये परत केले. बडे यांच्या या प्रामाणिकपणाचे लोकमत परिवाराकडून कौतुक करण्यात आले.
"लोकमत"मधील कर्मचारी रामनाथ बडे हे बुधवारी दुपारी मनमाड रोडवरील झोपडी कँटीनसमोरून जात असताना त्यांना एक पाकीट रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. त्यांनी ते पाकीट उचलले असता त्यामध्ये नऊ हजार रुपयांची रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधारकार्ड आणि इन्शुरन्स संदर्भातील कागदपत्रांच्या सत्यप्रती होत्या. बडे यांना हे पैसे घेण्याचा कोणताही मोह झाला नाही. त्यांनी कोणताही विचार न करता त्या पाकीटामधील कागदपत्रावर असलेल्या नंबरवर लगेच फोन केला. हे पाकीट शिवम नावाच्या तरुणाचे असल्याचे आढळून आले. बडे यांनी त्यांना लगेच झोपडी कँटीन येथे येण्याचे सांगितले. शिवम यांचे आई-वडील आजारी असून दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या औषध उपचारासाठी शिवम यांची दिवस-रात्र धावपळ सुरू आहे. याच धावपळीमध्ये पाकीट गहाळ झाल्याचे त्यांनी बडे यांना सांगितले. कोरोनाच्या संकट काळात आणि त्यात कुटुंबीय रुग्णालयात दाखल आहेत, अशा वेळी पैशांची मोठी गरज असते. पाकीट गहाळ झाल्याने शिवम हे अस्वस्थ झाले होते. मात्र, बडे यांच्यासारख्या प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळे पैशासह पाकीट परत मिळाले. कोरोनाच्या संकटातही कोणताही मोह न ठेवता बडे यांनी रक्कम परत केली, अशा शब्दांत शिवम यांनी बडे यांची प्रशंसा केली. दरम्यान, लोकमतचे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनी बडे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तसेच या प्रामाणिकपणाबद्दल बडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
पासपोर्ट फोटो- लोकमत फोल्डरमधून घ्यावा