अहमदनगर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने निवृत्त प्राचार्य डॉ. भि. ना. दहातोंडे यांनी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त व पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार केला. यावेळी विविध सामाजिक, राजकीय विषयांवर चिंतन झाले.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, शेतकरी व कामगार चळवळीचे अभ्यासक, मार्क्स-फुले-शिंदे-शाहू- डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. विद्याधर औटी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा पारनेर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी डॉ. भि. ना. दहातोंडे, सहसेक्रेटरी डॉ. मोहन देशमुख, प्राचार्य के. एच. शितोळे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. औटी म्हणाले, शेती व्यवसाय नुकसानीचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. प्रति शेतकरी व्यक्ती व प्रति शेतकरी कुटुंबाची जमीन धारणा, शेतीच्या आंदानाचा भांडवली खर्च, शेती उत्पन्न व शेतकरी उत्पन्न आणि नुकसान भरपाई या चार सूत्रांद्वारे शेती वाचवता येते. संशोधन चिंतन या माझ्या पुस्तकात ही सूत्रे आहेत. शेतकऱ्यांची नाकेबंदी करणे अन्यायकारक आहे.
शिंदे प्रतिष्ठानचे खजिनदार संभाजी काळे यांचे ८० व्या वर्षात पदार्पण झाले. त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे विश्वस्त रावसाहेब बाजीराव ढगे यांचा ८१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल केडगाव येथे सपत्नीक सत्कार केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिन्ही विश्वस्त एका व्यासपीठावर येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आल्याचे डॉ. दहातोंडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, महर्षी शिंदे यांचा विसर पडला ही शिंदे यांची शोकांतिका नसून ती महाराष्ट्राची शोकांतिका आहे. वास्तविक फुले ते महात्मा गांधी यांना जोडणारा पूल म्हणजे महर्षी शिंदे यांचे कार्य आहे, असे अभ्यासकांनी मत मांडले आहे. १८५० पासूनच्या शंभर-दीडशे वर्षात समाजसुधारणेच्या ज्या चळवळी झाल्या त्या सर्वांचा संगम महर्षी शिंदे यांच्या कार्यात आहे. फुले-शिंदे-शाहू- आंबेडकर या चौरंगी समन्यवयातूनच महाराष्ट्र सर्व दृष्टीने विकासाकडे वाटचाल करील.
या उपक्रमाबद्दल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. मा. प. मंगुडकर, बद्रीनाथ महाराज तनपुरे, एन. डी. पाटील, डॉ. द. ता. भोसले, प्रा. डॉ. जयसिंग पवार, विश्वस्त प्रा. यू. आर. ठुबे, प्राचार्य बी. बी. गवळी, प्रा. बी. एन. शिंदे, प्रा. एम. एस. गाडेकर, प्रा. सुनील रंधे, विधीज्ज्ञ सुभाष काकडे आदींनी कौतुक केले.
--------