हळगाव : जामखेड तालुक्यातील चौंडी गावातील सतरावर्षीय आरती सायगुडे या अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या आॅनर किलींगच्या प्रकारातून झाल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी मयत आरतीचा बाप पाडुरंग सायगुडे हाच आरोपी निघाला आहे. पोटच्या गोळ्याची निर्दयीपणे निर्घृण हत्या करणा-या बापासह आरतीच्या दोन मामांना बेड्या ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली.याप्रकरणी पांडुरंग श्रीरंग सायगुंडे, मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे ( दोघे राहणार- निमगाव डाकू, ता कर्जत) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.जामखेड तालुक्यातील चौंडी गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या चौंडी - मलठण रस्त्यावरील सायगुडे वस्ती येथील इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकणारी आरती सायगुडे ही बेपत्ता असल्याची तक्रारी २४ मार्च रोजी तिचे वडील पांडुरंग सायगुडे यांनी जामखेड पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान गुरूवारी सकाळी सात वाजता आरतीचा जळालेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आरतीच्या घरापासून अवघ्या चारशे मीटर अंतरावरील एका शेतातील शेत तलावाजवळ आरतीच्या बहिणींना शौचास गेल्यानंतर मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपास पथकाला घटनास्थळी आढळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे तसेच तिच्या घरात आढळून आलेले पुरावे याशिवाय तांत्रिक पुरावे यावरून आरतीची हत्या आॅनर किलींगचा प्रकार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरतीच्या मारेक-यापर्यत पोहचण्यासाठी पोलिसांनी तब्बल ३५ संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीअंती आरतीचा मारेकरी हा तिचा बाप व दोन मामा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पांडुरंग श्रीरंग सायगुंडे ( मयत आरतीचा बाप ) तसेच आरतीचे मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे ( दोघे राहणार निमगाव डाकू ता कर्जत) या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक निलेश कांबळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम आरतीच्या हत्येत अजून किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास घेत आहेत.