निंबळक : सारोळा कासार (ता. नगर) येथील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत श्रावणबाळ पेन्शन योजनेंतर्गत मिळालेली एक महिन्याची पेन्शन भाळवणी (ता. पारनेर) येथील कोविड सेंटरला दिली.
आमदार नीलेश लंके हे कोरोनाकाळात नि:स्वार्थ भावनेने गोरगरिबांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने सारोळा कासार येथील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन श्रावणबाळ पेन्शन योजनेअंतर्गत सुरू असलेली एक महिन्याची पेन्शन भाळवणी येथील कोविड सेंटरला दिली. ज्येष्ठ नागरिकांनी ग्रा. पं. सदस्य गजानन पुंड यांच्याकडे एक महिन्याचे मानधन दिले. त्याचबरोबर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी मच्छिंद्र नामदेव काळे यांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली. तसेच हिराबाई काळे, ताराबाई ढोरजकर, रखमाबाई देवकुळे, अशोक पोपळे, मेहबूब शेख, नाथा धामणे, गणपत धामणे यांनीही देणगी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, बाळासाहेब धामणे, रोहित काळे, मच्छिंद्र काळे, बाळासाहेब निंभोरे, प्रा. प्रशांत गावडे आदी उपस्थित होते.
---
३१ निंबळक