पारनेर : तालुक्यातील निघोज येथे ३१ जुलै रोजी मतदान होणार असले तरी मतपत्रिकेवरून आडव्या बाटलीचे चिन्हच हद्दपार झाल्याने दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, दारुबंदी निवडणुकीच्या मतपत्रिकेवर चिन्हेच नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून यात तत्काळ बदल केला नाहीतर आपण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर निघोजकरांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.निघोज येथे दारुबंदीसाठी रविवारी मतदान होत आहे. या मतदानासाठी महसूल विभागाकडे नियोजन असून शासनाच्या २००८ च्या अध्यादेशाप्रमाणे निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती समजली. दरम्यान, निघोजमधील दारुबंदी कार्यकर्त्यांची दारुबंदीचा प्रचार सुरू करताना आडव्या बाटलीवर शिक्का मारण्याचे आवाहन केले होते. मात्र काही दारू विक्रेत्यांनीच निवडणुकीमध्ये उभी बाटली-आडवी बाटली अशी चिन्हेच नसल्याचे म्हणत दारुबंदी चळवळीच्या आडव्या बाटलीवर आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, शासनाच्या २००८ चा अध्यादेशात पाहिले असता त्यात दारुबंदी निवडणुकीतील मतपत्रिकेत कोणतेच चिन्ह नसल्याचे दिसून येत असून फक्त मतदानाची तारीख, वेळ व ठिकाण यांच्यासह मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी किंवा बंद करावी, असे दोनच पर्याय देण्यात आले आहेत.यामुळे आता निघोजमधील महिलांची चिन्ह नसल्याने अडचण होणार आहे. यामुळे दारुबंदी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार
By admin | Published: July 27, 2016 12:07 AM