श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ७० गावांना वरदान ठरणारे घोड धरण सोमवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले. धरणाचे दोन दरवाजे उघडून घोड नदीपात्रात ८५० तर दोन्ही कालव्यांना प्रत्येकी २०० क्युसेकने पाणी सोडले आहे.
घोड ओव्हरफ्लो होताच लाभक्षेत्रातील युवा शेतक-यांनी धरणावर जाऊन या जलसागराला प्रणाम केला. तर काहींनी सोशल मीडियावर जल्लोष केला आहे. गेल्या वर्षी घोड धरण फ्रेंडशिपच्या दिवशी ओव्हरफ्लो झाले होते. यंदा २० दिवस उशिरा म्हणजे २४ आॅगस्टला ओव्हरफ्लो झाले आहे.
तीन तालुक्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारे घोड धरण १९६८ पासून म्हणजे ५३ वर्षात ३७ वेळा ओव्हरफ्लो झाले आहे. २०१२ सर्वात कमी म्हणजे धरण ४८ टक्के भरले होते, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.