संगमनेर : लाखोंच्या लाखोंच्या घरात असलेली अश्वांची किंमत, त्यांचे रूबाब आणि त्यांच्या दिमतीसाठी अश्वपालकांनी तैनात केलेला लवाजमा दोन दिवसांपूर्वी हिवरगाव पावसा (देवगड) यात्रेतील अश्व प्रदर्शनात संगमनेरकरांनी अनुभवला. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सुमारे दिडशेहून अधिक अश्व प्रदर्शनात सहभागी झाले होते.तालुक्यातील हिवरगाव पावसा (देवगड) येथे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचे देवस्थान आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे भरणा-या यात्रोत्सवानिमित्त चार वर्षांपासून संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अश्व प्रदर्शन भरविण्यात येते. यात भारतीय वंशाच्या विविध जातींचे उमदे अश्व सहभागी होतात. अश्वांबरोबरच त्यांचे नृत्य, चित्तथरारक कसरती, मागील दोन पायांचा उपयोग करून चालणे, पाटावर व बाजेवर उभे राहून वाद्यांच्या तालावर थिरकणे अशा अनेक प्रकारांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. प्रदर्शनात अश्वांना मारण्यास बंदी असते.संगमनेरातील प्रदर्शनात महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यातील अश्वपालक आपल्या लाखो रूपये किंमतीच्या अश्वांसह सहभागी झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून होणारे हे प्रदर्शन राज्यातील अश्व शौकिनांसाठी पर्वणीच ठरत आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या अश्वपालकांना लाखो रूपयांच्या आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले.
देवगड यात्रेतील अश्व प्रदर्शन; अलिशान वाहनांपेक्षाही अश्वांचा रूबाब भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 5:59 PM