तालुक्यात असलेली कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर यांची माहिती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहज मिळत नाही. त्यामुळे नातेवाइकांचा वेळ रुग्णालय आाणि बेड मिळविण्यासाठी जातो. मागील काही दिवसात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची धावपळ कमी व्हावी म्हणून रुग्णालयांची परिपूर्ण माहिती असलेल्या ॲपची सुविधा सुरू होईल. याबाबतची सर्व प्रक्रिया सुरू असून, थोड्याच दिवसात नागरिकांना आपल्या मोबाइलवर या ॲप्सच्या माध्यमातून रुग्णालयांची माहिती सोप्या पद्धतीने मिळणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
या ॲप्समध्ये प्रामुख्याने राहाता तालुक्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात असलेले बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड तसेच उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती प्रत्येक दिवशी अपडेट केली जाणार आहे. भविष्यात या ॲप्सच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेची माहितीही नागरिकांना मिळेल. गावनिहाय तसेच शहरांमध्ये प्रभागनिहाय लसीकरणाची माहिती दररोज उपलब्ध होईल. अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांच्या सहकार्याने मतदारसंघातील कुटुंबाचे सर्वेक्षण करून सहा महिन्यात नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा मानस असून, लसीकरण करणारा शिर्डी विधानसभा मतदारसंघ अव्वल ठरेल, असेही आमदार विखे म्हणाले. कोविडनंतर म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आणि उपचाराबाबतची माहिती दिली जाणार असून, शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स निर्माण करण्याबाबतही आपण सूचित केले असल्याचे विखे म्हणाले.
या संदर्भात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील सर्व सरकारी आणि खासगी डॉक्टरांसमवेत संवाद साधला. तयार केलेल्या ॲप्ससाठी रुग्णालयांची माहिती लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही वैद्यकीय व्यावसायिकांनी दिली. याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय गायकवाड, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे आदी उपस्थित होते.